nagraj manjule kavita marathi | pause kavita marathi

नागराज मंजुळे याच्या मराठी कविता | pause kavita marathi
नागराज मंजुळे याच्या मराठी कविता | nagraj manjule kavita marathi
nagraj manjule kavita marathiउन्हाच्या कटाविरूध्द या पुस्तकांमधील नागराज मंजुळे यांच्या या सर्व कविता आहेत. मला आवडलेल्या नागराज मंजुळे यांच्या कविता या ब्लॉगमध्ये दिल्या गेल्या आहेत.  मराठी कविता - पाऊस
मराठी कविता - एका पावसाची गोष्ट
मराठी कविता - तुझ्या येण्याअगोदर एक पत्र
मराठी कविता - रूक्मांगदा
पाऊस


आनंदाने
मदमस्त होऊन
पावसात भिजावं
असा मी नव्हतो
अवेळीच्या पावसानं
अवचित रस्त्यात गाठावं
तशी तू जीवनात आलीस 
आणि
पावसाशी एक वेगळंच नातं जुळलं

तुझ्यानंतर 
काळजात फोफावलेली
वाळवंटं... 
हाकारत राहतात पावसाला
पण... पाऊस
परागंदा होतो
वाऱ्याचा हात धरून

आजही 
मी दुरावणारा पाऊस
ढगाळलेल्या डोळ्यांनी
पाहत राहतो
गालावरच्या पावसाच्या थेंबात
आणखी एक अनावर थेंब
मिसळतो
आणि
चिखल होत जातो
... जीवघेणा

        - नागराज मंजूळे

नागराज मंजुळे याच्या मराठी कविता | nagraj manjule kavita marathi
nagraj manjule kavita marathi

एका पावसाची गोष्ट


पावसालाही आवडावी
इतकी ती सुंदर होती
म्हणूनच की काय
वेळीअवेळी 
रस्त्यानं येताजाता
पाऊस तिची वाट अडवायचा
पावसाला चुकवून
ती घर गाठायची
पाऊस मागं मागं जाऊन
तिच्या घराच्या खिडकीसमोर
कोसळत राहायचा
तासन् तास... 
पाऊस एवढा गळ्यात पडेल
असं तिला नव्हतं वाटलं
त्याला खुणावताना

आणि एक दिवस
तिला जे नको होतं
तेच घडलं
ती पावसात सापडली
तिला पाऊसस्पर्श
हवाहवासा वाटला
ती चिंब भिजली पावसात
शहारली
मोहरली
नि अंकुरलीही... 
पाऊस ओसरून गेल्यावर
स्वतःला सावरत
तिनं त्याच्याजवळ
तक्रार केली
तुझ्या नादानं
मी नको होतं भिजायला
या अवेळीच्या पावसात
सांग या भिजक्या अंगाने
मी घरी जाऊ कशी
आणि वाटेत तर 
नुसता चिखल झाला असेल आता
ती चिंब भिजली पावसात
यात दोष तिचा न पावसाचा
पावसात भिजल्यावर चिखल होऊन
वाट निसरडी होते
हे तिनं ओळखायचं होतं
पाऊस वेणीत माळतानाच
पुढे एक समीकरणच झालं
ती आणि पाऊस
पण अचानक एक दिवस
तिच्या घरात वाद उसळला
पावसात भिजल्यावरुन...
पावसाच्या जातीवरुन...धर्मावरुन
चिखलमाखल्या वाटेला भिऊन की काय
तिनं पावसात भिजल्याचं साफ नाकारलं

तेव्हापासून...
पावसाला आलीय मरणकळा
पाऊस असतो पडून
तिच्या त्याच बंद खिडकीसमोर
होऊन पाचोळा

       - नागराज मंजूळे
नागराज मंजुळे याच्या मराठी कविता | nagraj manjule kavita marathi
nagraj manjule kavita marathi
तुझ्या येण्याअगोदर एक पत्र


छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच
तुझी फोर व्हीलर येऊ शकेल
खाली झोपडपट्टीत अजूनही
एक पाऊलवाटचं नाक धरून
उकिर्ड्यातून वाट काढत खाली येते
पुलावरून पाहशील तेव्हा
महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती
विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली
खुजी घरे मोकळया आगपेट्यांच्या
ढिगाऱ्याखाली दिसतील
तुला मन आणि तोल सावरत
खाली यावं लागेल

खाली येशील तेव्हा
चारणारे रेकॉर्ड
दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद
छक्केपंजे, बादशाहबेगमचे रोजचेच विवाद
चारदोन शिव्याही तुझ्या कानी पडतील... कदाचित
शरमू नकोस

फाटक्या कपड्यांतील काही छोटी मुलं
तुला कुतूहलानं पाहत असतील
त्या वाट हरवलेल्या मुलांनाच
माझ्या घराची वाट विचार
तुझ्या अत्तराच्या सुगंधाने चाळ दरवळेल
त्या मुलांच्या मागून तू ज्या वाटेनं येशील
कदाचित त्या वाटेवर मागे चाळ गोळा होईल
बिथरू नकोस

जेव्हा तु मोठी गटार ओलांडून येशील 
तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डर्सच्या भल्याथोरल्या
होडिऀगच्या लोखंडी पायाच्या आधारानं
माझं घर उभारलेलं दिसेल

माझ्या दहा बाय दहाच्या घरात येशील तेव्हा
माझ्या भाबड्या आईचं गबाळं स्वागत
बनियान टॉवेलातला मी
आमची कण्हतधुपत पेटणारी चूल 
काळाकुळकुळीत चहा
आमचं ऑल इन वन घर
 ... हे सारं
तुला किळसवाणं वाटल्याची खूण
तुझ्या डोळ्यात पाहून
मी स्वतःची घृणा करण्यास  विवश होईल

तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे
तुझे 'डॅड' मला नवंकोरं भविष्य विकत घेऊन देतील
हे ठिकय... पण
मी माझी घृणा करेन इतपत
मेहरबानी करू नकोस माझ्यावर
माझ्या गरीबखान्यात येऊ नकोस शक्यतो

तू रंगवलेली स्वप्नं इथल्या भूमीत
अंकुरणार नाही
आणि मला बोन्साय होणं मान्य नाही

तू तुझी स्वप्नबीजं घेऊन जा
एक नवीन सुपीक जमीन शोध
माझ्या या वांझोट्या भूमीला
कधीतरी दिवस जातीलच
इथेही फुले फुलतील
स्वप्नं साकारतील
पण तोवर 
मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून
मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं
माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी

                     - नागराज मंजूळेरूक्मांगदा


रूक्मांगदा
या कातर कातर वेळी
मला तुझा चेहरा का आठवत नाही
दलदलीत धसत जाणाऱ्याच्या
हातांहून व्याकूळ होत जातात
माझे दर्शनातूर डोळे
तऱ्हेतऱ्हेने चाचपून
तुझ्या चेहऱ्याच्या रंगरेखा
तू तू आहेस
की आहेस धोखा
मला तुझा चेहरा का आठवत नाही

तुझ्यानंतर
तुझ्याशिवाय
या वाळवंटत जाणाऱ्या क्षणी
मी तुझा चेहरा आठवू लागलो
तर तुझे घनकुंतल
माझ्या त्वचेवर रेखतात
एका दुबो॔ध नृत्यमग्न लिपीत
तुझ्या चेहऱ्याचं अगम्य वर्णन

मी तुझा चेहरा आठवू लागतो तर 
नुसताच पाऊस कोसळत राहतो माझ्या आठवणभर
मी तुझा चेहरा आठवू लागतो तर 
सहस्त्र मोगऱ्यांच्या गंधान मी दरवळतो अंगभर
मी तुझा चेहरा आठवू लागतो तर 
मला आठवतो आईच्या गर्भातील मायाळू अंधार
पण मला तुझा चेहरा का आठवत नाही
मी डोळे गच्च मिटून
तुझा चेहरा आठवतोय प्राणांतिक
तर तुझ्या हजार रात्रीच्या झोपेचे
जडावलेले श्लील डोळेच
पुरासारखे वेढताहेत मला चहूबाजूंनी
माझे हळवे डोळे
विरघळून वाहून चालले आहेत की काय
तुझ्या पाणीदार डोळयांत

की असं असेल
तू देहाच्या सर्व सीमा ओलांडून
अतोनात जवळ आलीयस माझ्या
मी तुला अनुभवतोय नखशिखांत
अन् मी तुला पाहू शकत नाही

रूक्मांगदा
तू खरचं आहेस
की आहेस माझ्या स्वप्नांची
लोभस सावळी सावली
रूक्मांगदा
मी असं ऐकलंय
की पोरक्याला परक्यातही दिसते माऊली

             - नागराज मंजूळे

नागराज मंजुळे याच्या मराठी कविता | nagraj manjule kavita marathi
नागराज मंजुळे

नागराज मंजुळे
एक भारतीय फिल्म निर्माते आहेत तसेच पटकथा लेखक आहेत. नागराज मंजुळे हे सैराट पिक्चर साठी ओळखले जातात. उन्हाच्या कटाविरूध्द या कवितेच्या पुस्तकाला त्यांना भैरूरतन दमाणी पुरस्कार मिळाला आहे. वरील सर्व कविता उन्हाच्या कटाविरूध्द या पुस्तकामधील आहेत. 

पुरस्कार
भैरूरतन दमाणी पुरस्कार (२०११) 
नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार (२०१४) 
दया पवार स्मृती पुरस्कार (२०१४) 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब  पुरस्कार (२०१७) 
 ***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या