Mangesh Padgaonkar Sundar Marathi Poem | Marathi Kavita

Mangesh Padgaonkar Sundar Marathi Poem | Marathi Kavita
mangesh padgaonkar marathi poem
mangesh padgaonkar marathi poem
कवितेबद्दल-मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता या ब्लॉग मध्ये देण्यात आल्या आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी, तसेच कविता माणसांच्या माणसांसाठी या पुस्तकांमधुन घेण्यात आल्या आहेत. या सर्व कविता मंगेश पाडगावकर यांच्या आहेत. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता खास तुमच्यासाठी...

मराठी कविता  - पाखरांशी नातं असतं त्याचं गाणं
मराठी कविता  -  माणंस अजून गाऊ शकतात
मराठी कविता  -  खरं गाणं
मराठी कविता  -  होय्योचं गाणं
मराठी कविता  -  एकटं असावसं वाटतं

 पाखरांशी नातं असतं त्याचं गाणं


पाखरांनो, या मातीवर

सुखाने मी रांगत असतो,

तरीसुद्धा तुमच्याशी 

माझं नातं सांगत असतो ! 


आभाळाच्या अपारात 

तुम्ही उडत असता,

निळ्या निळ्या अथांगात

तुम्ही बुडत असता,


तेव्हा मी डोळे भरून

बघत असतो,

काही क्षण माझं स्वप्न 

जगत असतो ! 

पाखरांनो, या मातीवर

सुखाने मी रांगत असतो,

तरीसुध्दा तुमच्याशी 

माझं नातं सांगत असतो  ! 


इथलं जिणं कधीचं मी

शाप मानलं नाही,

मातीवरचं प्रेम कधीच

पाप मानलं नाही  ! 


मातीतच परमेश्वर 

हिरवागार रूजून येतो ;

मातीच्या मार्दवातच

फुलांनी सजून येतो  ! 


मातीवरुन वहाणारा

स्वर्गातसुध्दा वारा नसतो ;

आभाळाच्या करुणेला

मातीशिवाय थारा नसतो  ! 


पाखरांनो, या मातीवर

सुखाने मी रांगत असतो,

तरीसुध्दा तुमच्याशी 

माझं नातं सांगत असतो  ! 


तुम्हांलाही मातीवरच 

यावं लागतं,

आपलं अन्न इथेच बसून 

खावं लागतं ;


मातीच्याच आधाराने 

जगत असता, नांदत असता,

मातीवरच्याच काड्या जमवून

आपलं घरटं बांधत असता  ! 


तुमच्या या पंखाना

मातीचा वास असतो,

आणि तरी निळ्याभोर 

आभाळाचा ध्यास असतो  ! 


मातीचं मातीपण कळण्यासाठी

आभाळावर प्रेम हे केलंच पाहिजे,

अस्तित्वाला तुमच्यासारखे पंख फुटून

निळ्या निळ्या अपारात गेलंच पाहिजे  ! 


पाखरांनो, या मातीवर

सुखाने मी रांगत असतो,

तरीसुध्दा तुमच्याशी 

माझं नातं सांगत असतो  ! 

       

      कवी  - मंगेश पाडगावकर


           

माणंस अजून गाऊ शकतात


शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,

हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात  ! 


प्रत्येक वाट 

गोंगाटाच्या रानात घुसते ;

मोटारींच्या आवाजांची

खिळेठोक कानांत असते  ! 

असं असलं तरी माणंस

गाण्याला ताल अजून देऊ शकतात  ! 

शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,

हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात ! 


पुस्तकांच्या ओझ्याखाली

बाळपण सगळं चिरडून जातं ;

अक्राळविकराळ स्पर्धखाली

कोवळेपण भरडून जातं  ! 


असं असलं तरी मुलं

फुगे घेऊन बागेत अजून धावू शकतात  ! 

शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,

हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात  ! 


कटुतेचा पाऊस 

घरं झोडून जातो ;

विश्वासाचा कणा

पार मोडून जातो  ! 


तरी माणंस  मायेने

बाळाचा पापा घेऊ शकतात  ! 

शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,

हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात  ! 

       

         कवी - मंगेश पाडगावकर


mangesh padgaonkar marathi poem
mangesh padgaonkar marathi poemखरं गाणं


पाखरांना ठाऊक असतं :

बाजारात गळा विकून

आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही  ;


सोन्याच्या पिंजऱ्याला

पंख विकून 

आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही ! 


      कवी - मंगेश पाडगावकर
होय्योचं गाणं


होय्यो  ! होय्यो  ! होय्यो  ! 

' य ' यातला शबल आहे  ? 

चांगला घट्ट डबल आहे  !! 


प्रश्न तुमच्या मनातला

कळतो आहे  ! 

माझा रोख त्याच्याकडेच 

वळतो आहे  ! 


' होय्यो '  हा कसला मंत्र असेल  ? 

किंवा गूढ साधनेचं तंत्र असेल  ? 

शब्दांच्या अलिकडचं काही असेलं  ? 

शब्दांच्या पलिकडचं काही असेलं  ? 

प्रश्न तुमचा अधिक अधिक 

खोल जाईल

आणि शेवटी चक्कर येऊन 

तोल जाईल  !! 


बायबल शोधा, कुराण शोधा,

गीता किंवा पुराण शोधा,

होय्यो कुठे मिळणार नाही  ! 

किती जरी शोधलंत तरी कळणार नाही  !! 


जितके अर्थ शोधीत बसाल, 

तितके तुम्ही अधिक फसाल  ! 


होय्यो  ! होय्यो  ! 

होय्यो  !  होय्यो  ! 


विद्वानांच्या सभेला 

एकदा मला जावं लागलं,

न पचणार ज्ञान तिथे

आणि मला खावं लागलं  !! 


विद्वानांचं एक लक्षण ठाऊक आहे  ? 

विद्वान कधी दुसऱ्याचं ऐकत नसतो, 

विद्वान फक्त न थांबता बोलत असतो  !! 


खूप होते तिथे विद्वान,

एकापेक्षा एक महान  ! 


बोलत होते, बोलत होते, बोलत होते  ! 

न थांबता तोंड सारखं खोलत होते  !! 


काय झालं एकदम मला कुणास ठाऊक  ! 

मी सभेत ताडकन उभा झालो,

मोठ्याने ओरडलो  :

" होय्यो  ! होय्यो  ! "

होय्यो होय्यो करीतच बाहेर पडलो  ! 


अंधार पडू लागला होता,

छानपैकी वारा होता  ;

फुललेल्या मोगऱ्यासारखा

एक सुंदर तारा होता  ! 


वाऱ्याला मी म्हणालो : होय्यो  ! 

ताऱ्याला मी म्हणालो : होय्यो  ! 


होय्यो  ! होय्यो  ! होय्यो  ! 


     कवी - मंगेश पाडगावकर

 

                    


एकटं असावसं वाटतं


कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं, 

आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं  ! 


अवती भवती रान सगळं

मुकं मुकं असतं, 

वाट दिसू नये इतकं

धुकं धुकं असतं  ! 


झाडाखाली डोळे मिटून बसावंसं वाटतं, 

कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं, 

आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं  ! 


येते येते... हूल देते  :

सर येत नाही, 

घेते घेते म्हणते तरी

जवळ घेत नाही  ! 


अशा वेळी खोटं खोटं रुसावसं वाटतं, 

कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं, 

आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं  ! 


कुठे जाते कुणास ठाऊक

वाट उंच-सखल, 

त्यात पुन्हा सगळीकडे

निसरडीचा चिखल... 


पाय घसरून आदळल्यावर हसावंसं वाटतं, 

कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं, 

आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं  ! 


पाखरं जरी दिसली नाहीत

ऐकू येतात गाणी, 

आभाळ कुठलं कळत नाही

इतकं निवळं पाणी  ! 


आपल्या डोळयांत आपलं रूप दिसावंसं वाटतं, 

कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं, 

आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं  ! 


ओळीमागून गाण्याच्या 

थरारत जावं, 

आभाळातून रंगांच्या

भरारत जावं  ! 


सुरांच्या रानात भुलून फसावंसंं वाटतं, 

कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं, 

आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं  ! 


    कवी - मंगेश पाडगावकर


                        

                                                   
***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या